आज पावसाचा अंदाज ; मान्सून अजून थांबला नाही आज ही या जिल्ह्यांना रेड-यलो अलर्ट जारी.
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यांसाठी रेड आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी चिंताजनक ठरत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Intense Low-Pressure Area) निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. गेल्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. लातूरच्या अहमदपूर येथे तब्बल १७० मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मध्य भारतातून पश्चिमेकडे सरकलेल्या कमी दाब प्रणालीमुळे महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता वाढली आहे. लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे.
-हवामान विभागाचा अलर्ट
हवामान विभागाने (IMD) खालील जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केले आहेत:
* रेड अलर्ट (Red Alert): पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथा.
* ऑरेंज अलर्ट (Orange Alert): रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगर.
* यलो अलर्ट (Yellow Alert): नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली.
मान्सूनच्या परतीला विलंब आणि पुढील अंदाज
सध्या दक्षिण अंतर्गत ओडिशामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) राजस्थान, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून माघारले असले तरी, मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने मान्सूनच्या परतीला राज्यात विलंब होण्याची शक्यता आहे.
या प्रणालीची तीव्रता हळूहळू कमी होत असली तरी, १ ऑक्टोबर रोजी पुन्हा बंगालच्या उपसागरात नवे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे आहेत.
नागरिकांसाठी इशारा आणि शेतकऱ्यांसाठी सल्ला
राज्यातील कोकणपट्टी, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा धोका असल्याने नागरिकांनी नद्या-नाल्यांच्या पुराच्या पाण्यापासून दूर राहावे आणि धोकादायक ठिकाणी प्रवास टाळावा. तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला:
1) शेतात पाणी साचू देऊ नका. नाले, गटारे व पिकांच्या फटींचा निचरा चालू ठेवावा
2) कापणीस योग्य असलेली पिके सध्या काढू नका. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच कापणी करा.








