पीएम किसान योजना ; या शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेआधीच 21 वा हप्ता जमा.
पीएम किसान योजना ; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता थेट वर्ग केला जातो. या योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण २० हप्ते मिळाले आहेत आणि सर्व शेतकरी बांधव पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या योजनेच्या हप्त्याबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, ऑक्टोबर महिन्यात लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा २१ वा हप्ता जमा केला जाईल. दिवाळीपूर्वी पीएम किसानचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, या चर्चांदरम्यानच पीएम किसानच्या काही लाभार्थ्यांना २१ वा हप्ता मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील तीन राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी पीएम किसानचा २१ वा हप्ता लवकर जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे संबंधित राज्यातील सुमारे २७ लाख शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
तीन राज्यांना वेळेआधी हप्ता का मिळाला?
उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये अलीकडे भीषण नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हेच कारण आहे की, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने केंद्र सरकारने या संबंधित राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ लवकर देण्याचा निर्णय घेतला. या तीन राज्यांतील २७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५४० कोटी रुपये वेळेआधीच वर्ग करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वाढती मागणी
ज्याप्रमाणे या तीन राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती तयार झाली होती, तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त भीषण परिस्थिती सध्या आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. अतिवृष्टी आणि पूर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तात्काळ आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
निश्चितच, राज्य सरकारने नुकसानीसाठी तात्काळ भरपाई जाहीर केली आहे. मात्र, ही नुकसान भरपाई म्हणून दिली जाणारी रक्कम फारच तुटपुंजी असल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
अशा स्थितीत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही पीएम किसानचा २१ वा हप्ता वेळेआधीच (तात्काळ) मिळायला हवा, अशी आग्रही मागणी आता उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार असा काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन लाभ देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








