माणिकराव खुळे हवामान अभ्यास ; राज्यात परतीचा पाऊस अजून किती दिवस.
🔴 माणिकराव खुळे यांचा हवामान अंदाज: राज्यात दसऱ्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता
मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रूपांतर झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आज (शनिवार, २७ सप्टेंबर) सकाळपर्यंत हवेच्या तीव्र कमी दाबात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर (अहमदनगर) मार्गे मुंबईकडे मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. यामुळे आज, शनिवार (२७ सप्टेंबर) पासून ते दसऱ्यापर्यंतच्या (५ दिवसात) संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२७ ते ३० सप्टेंबर या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर धरणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
🔴अतिजोरदार पावसाचे जिल्हे आणि तारखा:
शनिवार, २७ सप्टेंबर
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर आणि नांदेड.
रविवार, २८ सप्टेंबर
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा.
सोमवार व मंगळवार, २९ व ३० सप्टेंबर
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा.
🔴 पावसाच्या उघडीपीची शक्यता कधीपासून?
शुक्रवार, ३ ऑक्टोबर पासून पावसाची पूर्णतः नव्हे, परंतु काही प्रमाणात उघडीप (विश्रांती) मिळण्याची शक्यता आहे.
या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांवरील धरणातून पुन्हा एकदा पूर पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.
.








