महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्रात सध्या हवामानाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. दोन वर्षांपूर्वी ‘एल निनो’मुळे महाराष्ट्र तसेच देशातील इतर राज्यांना कोरड्या दुष्काळाची झळ बसली होती, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. राज्यात सध्या ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात आणि चालू सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी, लाखो हेक्टर शेतीचे क्षेत्र पाण्याखाली गेले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले शेतकऱ्यांचे पीक या पावसामुळे पूर्णपणे खराब झाले आहे.
या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र, सरकारने दिलेली ही नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याने, आता शेतकऱ्यांकडून राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये अजूनही वादळी पाऊस सुरूच आहे. त्यामुळे ही पावसाळी परिस्थिती कधीपर्यंत निवळणार, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २९ सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, बहुतांश भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) ५ ऑक्टोबरपूर्वी परतण्याची शक्यता नाही. म्हणजेच, पुढील काही दिवस महाराष्ट्रावर पावसाचे सावट कायम राहणार आहे.








