Ativrushti Nuksan bharpai ; राज्यातील या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 1339 कोटींची मदत.
Ativrushti Nuksan bharpai ; राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान वाटपाचा निर्णय घेतला आहे.यामध्ये वीस जिल्ह्यांचा समावेश असून २०२३ च्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार जास्तीत जास्त २ हेक्टरच्या मर्यादेत मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (ता.२३) शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
राज्यात विविध जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी तातडीने मदत द्यावी अशी मागणी करत होते. त्यातच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान केले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, कांदा, ऊस, तूर, मुग, उडीद, मका पिकासह भाजीपाला आणि फळबाग पिकांना मोठा तडाखा बसला आहे.
राज्य सरकारने अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी ५६५ कोटी ६० लाख ३० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर नागपूर जिल्ह्यातील गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी २३ कोटी ८५ लाख २६ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.
तर पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी १४ कोटी २८ लाख ५२ हजार रुपयांसाठी मान्यता दिली आहे. छत्रपती संभाजीनगर विभगातील हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यासाठी ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजार आणि नाशिक विभगातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १३ कोटी ७७ लाख ३१ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर अनुदान महाडीबीटी मार्फत जमा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. परंतु राज्य सरकारने अनुदानाच्या निकषांमध्ये बदल केला आहे. २०२३ च्या शासन निर्णयानुसार अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या ३ हेक्टरऐवजी आता जास्तीत जास्त २ हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळू शकेल. तसेच मदतीच्या दरातही राज्य सरकारने कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे.








