लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीत एकत्र मिळणार?
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याची लाभार्थी महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता ऑक्टोबर महिनाही सुरू झाला असून, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन्ही हप्ते कधी जमा होणार, असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे.
मागील काही महिन्यांपासून या योजनेचे हप्ते वेळेवर जमा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता लांबणीवर गेल्याने विशेष आश्चर्य वाटण्यासारखे नाही. मात्र, हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
दिवाळीत ‘₹३,०००’ मिळण्याची आशा
सणासुदीचा काळ पाहता, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देऊन महिलांना थेट ₹३,००० (दोन महिन्यांचे) दिले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार दिवाळीचा मुहूर्त साधून हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करतील, अशी आशा आहे. याबाबत लवकरच आदिती तटकरे घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केवायसी (KYC) केलेल्या महिलांनाच मिळणार सप्टेंबरचा हप्ता
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता केवळ ज्या महिलांनी त्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाच सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. या योजनेत केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले असून, यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे, सर्व महिलांनी त्वरित केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.








