शक्ती चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट.
राज्यात पुन्हा एकदा हवामान अस्थिर झाले असून, शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. ‘शक्ती’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस पावसाचे वातावरण.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील दक्षिण आणि मध्य भागात ढगाळ वातावरण आणि अस्थिर हवामान राहील. हवामान विभागाच्या माहितीनुसार, १० ऑक्टोबरपर्यंत पावसाची सक्रियता कायम राहणार आहे.
या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोकण विभाग: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा इशारा.
पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’. पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.
मराठवाडा: बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट.
इतर विभागांतील स्थिती
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांसाठी कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी, या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ: पूर्व विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ भागात तुरळक ठिकाणी सरींची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मराठवाड्यात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
मान्सूनच्या परतीच्या पार्श्वभूमीवर हवामान अस्थिर असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पिकांची काढणी आणि साठवण करताना खालील दक्षता घ्यावी:
पावसाचा जोर ओसरल्यानंतरच सोयाबीन आणि मका यांसारख्या पिकांची काढणी करावी. ओल्या मातीमुळे पिकांचे नुकसान होऊन बियाण्यांची गुणवत्ता घटू शकते.
काढणी केलेले धान्य ओलसर ठिकाणी ठेवू नये, अन्यथा बुरशी आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ओलावा कमी केल्याने बियाण्यांचा टिकाऊपणा वाढतो.
पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजावर लक्ष ठेवून पिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलावीत, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.








