Nuksaan bharpaai Hectare kiti ; आता मिळणार हेक्टरी इतकी मदत मिळणार, पुनर्वसन मंत्र्यांनी दिली माहिती
अतिवृष्टी मदत आणि राजकीय पाहणी: शेतकऱ्यांच्या बांधावर नेते परभणी जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीनंतर आता सरकारने एक नवीन जीआर (शासन निर्णय) काढला आहे. या जीआरनुसार, शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे साडेआठ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची मदत मिळणार आहे.
तरीही, ही मदत वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना या मदतीत वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. “ही मदत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल आणि शेतकऱ्यांना एकटे सोडले जाणार नाही,” असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक प्रशासनाकडून लवकरच या मदत वाटपाच्या कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा
राज्यभरात मंत्र्यांकडून पाहणी सुरू असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याचा दौरा केला. त्यांनी बीड, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांतील नुकसानीचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्या हातात काही नसले तरी मी तुमच्या पाठीशी आहे. कोणीही खचू नका, टोकाचे पाऊल उचलू नका.” शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेऊ नयेत यावर त्यांनी भर दिला.
या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. “मराठवाड्यात पहिल्यांदाच असे दृश्य दिसत आहे. याआधी इथे कायम दुष्काळाची झळ बसायची, पण आता पावसाने सगळे उद्ध्वस्त केले आहे. हे संकट खूप मोठे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी योग्य असली तरी, “सध्याच्या प्रसंगी मी त्यावर भाष्य करणार नाही, कारण ते राजकारण ठरेल,” असे ते म्हणाले. मात्र, सध्या सरकारने जाहीर केलेली मदत २०२३ च्या निकषानुसार असून, ती परिस्थिती पाहता अपुरी आहे असे मतही ठाकरेंनी व्यक्त केले.
मराठवाड्यातील नुकसानीची भीषणता
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात पावसाने मोठा कहर केला आहे. बीड, जालना, लातूर आणि परभणी जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आणि पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर अशा हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनीसोबतच पशुधन आणि घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.








